(Pune Crime) पुणे : बांधकाम व्यावसायिकाने घेतलेले कर्ज परत केले मात्र एक हप्ता थकला असताना सावकाराने गहाण ठेवलेली चारचाकी गाडी परस्पर विकण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच सर्व पैशांची परतफेड केल्यानंतरही आणखी १० लाख रुपये दिले नाही तर जीवे मारुन टाकून गाडी पेटवून देऊ अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!
याप्रकरणी एका ३७ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी योगेश गिरी व योगेश काळे (दोघे रा. धनकवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सिव्हील इंजिनिअर असून त्यांच्या पतीचा बांधकाम व्यवसाय आहे. पतीच्या बांधकाम व्यवसायात आर्थिक अडचण आल्याने त्यांनी योगेश गिरी व योगेश काळे यांच्याकडून ९ मे २०१९ रोजी १० टक्के व्याजाने ३ लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यासाठी त्यांची इनोव्हा गाडी गहाण ठेवली. त्यांनी पहिल्या महिन्याचे २७ हजार ५०० रुपये व्याज कट करुन २ लाख ४२ हजार ५०० रुपये दिले. त्यानंतर त्यांच्या पतीने पुढील दोन महिन्यांचे व्याज दिले. परंतु, तिसर्या महिन्याचे व्याज वेळेवर देता आले नाही.
तेव्हा त्यांना राणे नावाच्या व्यक्तीचा फोन आला. तुमची गाडी योगेश गिरी व योगेश काळे यांनी मला विकली आहे. टी टी फॉर्मवरील सह्या आरटीओमध्ये जुळल्या नाहीत. तुम्ही फॉर्म दुरुस्त करुन द्या, असे त्याने सांगितले. तेव्हा त्यांनी आम्ही गाडी विक्री केली नाही, गहाण ठेवली असल्याचे सांगितले. त्यावर त्याने या कामासाठी खर्च झालेले ४१ हजार रुपये त्यांच्याकडून वसुल केल्यावर गाडीचे आर सी बुक दिले. याचा जाब विचारल्यावर तुम्ही व्याजाची रक्कम वेळेत परत केली नाही तर गाडीचे सर्व पार्ट वेगवेगळे करुन विक्री करणार अशी धमकी दिली.
दरम्यान, एकूण ४ लाख २० हजार रुपये परत करुन गाडीची मागणी केली. तेव्हा त्यांनी गाडी पाहिजे असेल तर आणखी १० लाख रुपये द्यावे लागतील. १० लाख रुपये दिले नाहीत तर तुझी गाडी पेटवून देतो आणि मारुन टाकतो, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक गुप्ता तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Theur Crime : थेऊर येथे ऊसाच्या पाचटाला लावली आग; दीड लाखांचे ठिबक जळाले!
Pune Crime : सायबर चोरट्यांचा प्रताप ; लष्करात नोकरीस असल्याचे सांगून घातला गंडा!