सुरेश घाडगे
उस्मानाबाद : नळदुर्ग आणि अणदूर येथील खंडोबाला ६१ किलो चांदीचे सिंहासन बनविण्यात आलेले आहे. आणि या सिंहासनासाठी तब्बल ३८ लाख रुपये खर्च आला आहे. आणि हे सिंहासन बनविण्यासाठी २१ दिवस लागले आहेत.
महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह नळदुर्ग येथे झाल्याची आख्यायिका आहे. या ठिकाणी महाराष्ट्रासह, परिसरातून कर्नाटक,आंध्रप्रदेश येथून लाखोंच्या गर्दीने भाविक येतात. भाविक येथे नवस हा पशू बळी देऊन नाही तर भंडारा उधळून पूर्ण करतात. तसेच या मंदिरासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व छत्रपती शाहू महाराज यांनी या मंदिराचा सभामंडप बांधण्याचा उल्लेख आढळतो.
मंदिरातील पूर्वीचे सिंहासन हे पितळी होते. त्याची झीज झाली होती. त्यामुळे ते बदलून लातूर येथील कारागीरांच्या माध्यमातून सागवानी सिंहासन तयार करण्यात आले. नंतर याला पुढे नाशिक येथील कारागीर परेश कुलकर्णी यांच्या माध्यमातून चांदी मढवण्यात आली आहे. हे सिंहासन बनविण्यासाठी साधारणत: ६१ किलो ९९% शुद्ध चांदीचा उपयोग झाला असून अंदाजे ३८ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.
अणदूरचे मंदिर तीन टप्प्यात झाले आहे. पुढे नळदुर्ग आणि अणदूरमध्ये देवाच्या मूर्तीसाठी वाद सुरू झाला. त्यानंतर अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्गमध्ये पावणे दोन महिने देवाची मूर्ती ठेवण्याचा करार झाला. तो करार आजही पाळला जातो. अणदूर येथील ठिकाणी देवाचे वास्तव्य हे १० महिने व ऊर्वरित २ महिने हे कर्नाटकातील खानापूर येथे असते.
या दोन्ही मंदिराचे पुजारी एकच असून, ट्रस्ट सुध्दा एकच आहे. जेव्हा देवाची मूर्ती अणदूरला असते तेंव्हा नळदुर्गच्या मंदिरात फक्त शिवलिंग दिसते, श्री खंडोबा महादेवाचा अवतार असल्याने मूर्तीच्या खाली शिवलिंग दिसते. श्री खंडोबाची मूर्तीही एक शिवलिंग असून, त्यावर हळदीचा लेप लावून नाक, डोळे बसविले जातात. त्यावर चांदीचा किरीट चढवला जातो. सकाळ आणि रात्री दोन वेळा सोहळ्यात पूजा केली जाते. रात्री शेजारती म्हटली जाते. दोन्ही पूजेच्या वेळी नगारा वाजवला जातो. तो मान मुस्लिम भक्त याकूब शेख यांच्याकडे आहे.
दोन मंदिरे, मूर्ती एक : या खंडोबाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, अणदूर आणि मैलारपूर या दोन्ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत. यातील अंतर ४ किलोमीटरचे आहे. खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि मैलारपूर येथे पावणे दोन महिने वास्तव्य असते. मंदिरे दोन पण मूर्ती एक अशी शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे. तसेच अणदूरहून नळदुर्गला आणि नळदुर्गहून अणदूरला देवाची मूर्ती नेताना दोन्ही गावातील मानकऱ्यांमध्ये लेखी करार केला जात असल्याची माहिती श्री खंडोबा मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी दिली.
दरम्यान, उस्मानाबाद – सोलापूर या महामार्गावर उस्मानाबाद पासून ५५ किमी व सोलापूर पासून ४० किमी अंतरावर अनदूर आणि नळदुर्ग या दोन गावा दरम्यान हे प्राचिन मंदिर आहे. पहाटे ६ वाजता दररोज खंडोबाची आरती केली जाते. दिवसभर मंदिर दर्शनासाठी खूले असते. रात्री ८ वाजता आरती करून प्रसाद वाटला जोतो त्यानंतर मंदिर बंद केले जाते.