(Sangli Crime ) सांगली : दारुच्या नशेत बापानेच पोटच्या मुलीला विहिरीत टाकून चिमुकलीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उडकीस आली आहे. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
आणप्पा तुकाराम कोळी (सध्या रा. कुरळप, ता. वाळवा, जिल्हा सांगली) असे निर्दयी बापाचे नाव आहे. या प्रकरणी राजेंद्र कोळी यांनी कुरळप पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
दारूच्या नशेत 4 वर्षाच्या मुलीला विहिरीत टाकून दिले….!
मिळालेल्या माहितीनुसार, अन्नाप्पा कोळी यांचे कुटूंब कडक लक्ष्मीचा व्यवसाय करत असून ते मागील पंधरा वीस वर्षांपासून कुरळप येथील पाण्याच्या टाकीजवळील माळरानावर वास्तव्यास आहेत.
मंगळवारी (ता.14) रात्री 9 ते 10 ववाजण्याच्या सुमारास अण्णापा कोळी याने दारूच्या नशेत आपल्या 4 वर्षाच्या पोटच्या मुलीला कुरळप येलूर जाणाऱ्या रोडवर असणाऱ्या रस्त्याकडील मेतुगडे यांच्या विहिरीत ढकलून देऊन घरी गेला.
त्याचा भाऊ राजेंद्र कोळी हा ऊस तोडून घरी आला असता, त्याला घरात मुलगी दिसली नाही. मुलगी कुठे आहे असे आरोपी अन्नाप्पाला त्याने विचारले असता विहिरीत टाकल्याचे सांगितले.
दरम्यान, या प्रकाराची कुरळप पोलिसात माहिती देण्यात आली. इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, सहाय्य्क पोलीस निरीक्षक दीपक जाधव, पो. ना. अनिल पाटीलसह पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत रात्री 2 पर्यत पाहणी केली. मात्र पाणी जास्त असल्याने मुलगी दिसून आली नाही.
विद्युत मोटारी रात्रभर सुरु करून पाणी कमी केल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता मुलीचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसून आले. मुलीचा चुलता राजेंद्र कोळी यांने विहिरीत उतरून प्रेत बाहेर काढले. हे दृश्य मन हेलावून टाकणारे होते. तर राजेंद्र याला शोक अनावर झाल. निर्दयी बाप अन्नापा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र बाप्पानेच पोटच्या लहान मुलीचा जीव घेतल्याने गावात संताप व्यक्त होत असून चिमुकलीचा असा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.