लोणी काळभोर : कारखाना चालवण्यासाठी अगर कारखान्याची कुठलीही मालमत्ता भाड्याने न देता तातडीने संचालक मंडळाची (Demand of members) निवडणूक घेऊन इतर सर्व अडचणी सोडविण्याचा प्रयत्न लोकनियुक्त संचालक मंडळाने (Board of Directors) करावा. असा ठराव (decision) मंजूर करुन थेऊर (ता. हवेली) (Theur News) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची (Yashwant’ factory) अधिमंडळ विशेष सर्वसाधारण सभा (in general meeting) खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यशवंत सहकारी साखर कारखान्याची अधिमंडळ विशेष सर्वसाधारण सभा
गेली बारा वर्षे बंद असलेल्या थेऊर ( ता. हवेली ) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची अधिमंडळ विशेष सर्वसाधारण सभा आज शनिवार दि. ११ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता, प्रशासकिय समिती अध्यक्ष तथा पुणे विभागाचे प्रादेशिक उपसंचालक ( साखर ) संजय गोंदे यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली होती. चार वाजता कोरम अभावी सभा तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर अर्ध्या तासाने सभा सुरू झालेली बरोबर एका तासात संपली.
या सर्वसाधारण सभेत सन २०११ पासून कारखाना बंद स्थितीत असल्याने तो चालू करण्याबाबत चर्चा करणे, कारखान्याची निवडणूक घेण्या बाबत चर्चा करून निर्णय घेणे, निवडणूक प्रक्रियेसाठी सभासद यादी अद्ययावत करणे, मयत वारस नोंदी, भाग हस्तांतरण इत्यादी बाबत चर्चा करणे व निर्णय घेणे, कारखान्याचा आसवणी प्रकल्प, पेट्रोल पंप, शाळा, इत्यादीच्या कामकाजाबाबत चर्चा करणे, गोदाम व इतर अनुषंगिक मालमत्ता भाडेतत्वावर देण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, कारखान्यावर सद्यस्थितीत चालू असलेले बँक दावे तसेच अन्य न्यायालयीन प्रकरणांचा आढावा घेणे, संस्थेची एकूण मालमत्ता व अतिक्रमणे इत्यादीबाबत माहिती घेऊन चर्चा करणे व निर्णय घेणे, तसेच अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांचा विचार विनिमय करणे आदी विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार होते.
या वेळी प्रशासकीय समितीचे अध्यक्ष संजय गोंदे, त्यांचे सहकारी डि एन पवार, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, जिल्हा बॅन्केचे माजी संचालक प्रकाश म्हस्के, संचालक प्रदीप कंद, कारखान्याचे माजी अध्यक्ष के डी कांचन, माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, माजी संचालक सुरेश घुले, पांडुरंग काळे, प्रताप गायकवाड, सुभाष जगताप, रोहिदास उंद्रे, महादेव कांचन, राहुल काळभोर, माजी सभापती प्रकाश जगताप, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे, भाजपचे राहुल शेवाळे, ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष प्रशांत काळभोर यांच्यासह साधारण पाचशे शेतकरी सभासद उपस्थित होते.
सुरुवातीला प्रास्ताविक करताना प्रशासकीय समितीचे अध्यक्ष संजय गोंदे यांनी कारखान्याच्या आर्थिक परिस्थिती बाबत माहिती दिली. कारखाना सुरू होण्याची हि शेवटची संधी असून सभासदांनी या संधीचे सोने करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सन २०१८ नंतर कारखान्याचे लेखापरीक्षण करण्यात आले नसून वाळवीमुळे कारखान्याचे रेकाॅर्डही खराब झाल्याची माहिती त्यांनी दिली. विविध बॅन्कांचे साधारण ११६ कोटी, शासनाचे, शेतक-यांचे, कामगारांचे व पुरवठादारांचे मिळून एकूण सव्वाशे ते दिडशे कोटी रुपये कारखान्यावर कर्ज आहे.
यावेळी बोलताना माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांनी मागील कुठलाही विषय न काढता, प्रशासकीय समितीने कारखान्याची निवडणूक घ्यावी. त्या साठी लागणारा खर्च म्हणून राज्य सहकारी बॅंकेकडून ५० लाख रुपये अजून कर्ज घ्यावे. कारखान्याला असलेल्या इतर अडचणी सभासदांनी निवडून दिलेले संचालक मंडळ सोडवेल असा ठराव मांडला. या ठरावाला पांडुरंग काळे, सुरेश घुले, अण्णासाहेब काळभोर, भरत कुंजीर यांनी अनुमोदन दिले. विकास लवांडे यांनी मयत सभासदांचे सात बारा तपासून त्यांच्या वारसनोंदी करुन घ्यावी असे मत व्यक्त केले. पांडुरंग काळे यांनी कारखाना सुरू व्हावा म्हणून केलेल्या प्रयत्नां बद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव अण्णासाहेब काळभोर यांनी मांडला.
आजच्या सभेच्या कार्यक्रम पत्रिकेत एकुण ७ ठराव नमूद करण्यात आले होते. कारखाना सुरू करणे व निवडणूक घेण्याबाबत चर्चा हे दोनच विषय आज मंजूर करण्यात आले. उर्वरित इतर ठरावांवर निवडून आलेले संचालक मंडळ निर्णय घेईल असे ठरवण्यात आले. या वेळी प्रशासकीय समितीचे सदस्य डि एन पवार, सुरेश घुले, पांडुरंग काळे, अण्णासाहेब काळभोर, विकास लवांडे, धनंजय चौधरी, भरत कुंजीर, वसंत शेवाळे, हेमंत चौधरी यांनी ही मनोगत व्यक्त केले.
आजच्या बैठकीला अंदाजे ५०० सभासद उपस्थित
कारखान्याचे एकुण २१४०९ सभासद आहेत. मात्र आजच्या बैठकीला अंदाजे ५०० सभासद उपस्थित होते. सभासद उत्सुक व सक्रिय नसणे, नात्यागोत्याचे व पक्षीय राजकारण हि प्रमुख कारणे हा कारखाना बंद पडण्यामागे आहेत अशी चर्चा उपस्थितांमध्ये यावेळी रंगली होती. आजच्या बैठकीतील ठरावा नंतरही कारखाना सुरू करण्या संदर्भात नक्की काय होईल याबद्दल ही सभासद यावेळी चर्चा करत होते.