पुणे : बाणेर रस्त्यावरून पुणे मेट्रोचे २० हजार रुपये किंमतीचे पाईप रिक्षातून चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे शहरात मेट्रोचे कामकाज सुरू असून मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी काही साहित्य ठेवण्यात आलेले आहे. सध्या बाणेर रस्त्यावर सकाळनगर परिसरात मेट्रोचे कामकाज सुरू असून चोरट्यांनी ५० नग लेजर पाईप चोरले आहेत. पहाटे साडे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
चोरीच्या या घटनेनंतर मेट्रोचे सामान असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. मेट्रोकडून साहित्य ठेवलेल्या ठिकाणी सुरक्षा रक्षक सुद्धा नेमण्यात आले आहे. तरीसुद्धा चोरीच्या घटना घटताना दिसून येत आहेत.
याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात रिक्षातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संजय मुलगे (वय ३५) यांनी तक्रार दिली आहे.
दरम्यान, शहरात यापुर्वीही मेट्रोच्या साहित्याची चोरी होण्याच्या घटना घडल्या आहेत. पहाटे तसेच मध्यरात्री साहित्याची चोरी होत असल्याचे दिसत आहे. शहरात ठिकठिकाणी मेट्रोचे कामकाज सुरू असून, त्याठिकाणी साहित्य ठेवण्यात आलेले असते. येथे सुरक्षा रक्षक देखील असतात. परंतु, तरीही चोरटे हे साहित्य चोरून नेत आहेत. पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस करत आहेत.