दौंड, (पुणे) : पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत असलेल्या एका तरुणीवर लग्नाचे अमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची घटना दौंड येथे नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी आई व मुलावर गुन्हा दखल करण्यात आला असून आरोपी मुलाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अतुल वामनराव कुतवळ व त्याच्या आई विरोधात (रा. दोघेही आलेगाव, दौंड) यांच्या विरोधात बलात्कार व ॲट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अतुल कुतवळ याला दौंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही अनुसूचित जाती प्रवर्गाची असून आरोपी कुतवळ हे दोघेही पोलीस भरतीसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण घेत होते. या सरावादरम्यान कुतवळ यांच्याशी फिर्यादीची ओळख झाली होती. या ओळखीतून २०२२ मध्ये आरोपीने पीडीतेला लग्नाची मागणी घातली. त्यावेळी तिने, मी मागासवर्गीय समाजाची आहे तू मराठा समाजाचा आहे तुझे घरचे आमचे लग्न होऊ देणार नाही असे सांगितले होते.
त्यानंतर मी माझ्या घरच्यांना लग्नाबाबत विचारतो असे आरोपीने सांगितले. पिडीतेच्या घरचे लग्नाला तयार झाले, परंतु आरोपीच्या घरच्यांकडून मुलीच्या जातीवरून लग्नाला विरोध झाला. तरीसुद्धा मी माझ्या घरच्यांना तयार करतो असे आरोपीने पीडीतेला सांगितले होते.
दरम्यान, आरोपीने पिडीतेला वारंवार लग्नाचे अमिष दाखवून वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पिडीतिने लग्नाबाबत विचारणा केली असता, तू मागासवर्गीय समाजाची असल्या कारणाने मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही असे सांगून तिची फसवणूक केल्याने पिडीतेने आरोपी अतुल कुतवळ विरोधात दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेचा पुढील तपास दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस करीत आहेत.