पुणे : कसबा पोट निडणुकीची चर्चा जोरात सुरु असतानाच काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांने भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहिल्याने राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. पत्रात थेट ‘दादा पुणेकरांना वाचवा’ असे नमूद केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पुणेकरांना स्वतः च्या मालकीच्या घराच्या घरपट्टीमध्ये 40 टक्के सवलत मिळत होती. ही सवलत आता रद्द करण्यात आल्याच्या पुणेकरांना नोटीसा आल्या आहेत. त्यामुळे प्रदेश काँग्रेस सरचिटणीस संजय बालगुडे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पुणेकरांना वाचविण्यासाठी साद घातली आहे.
“पुण्यातील नागरिकांना 1970 सालापासून स्वतः च्या मालकीच्या घरात राहात असल्यास घरपट्टीमध्ये 40 टक्के सवलत मिळत होती. 2011 मध्ये महालेखा परिक्षकांनी याबाबत नोंदवला होता. पुणे महापालिकेच्या गेल्या 30 वर्षांपासून असलेल्या अनेक निर्णयांबाबतही आक्षेप नोंदवला होता. याचाच आधार घेऊन 2018 मध्ये तुमचे सरकार असताना व तत्कालीन मुख्यमंत्र्याच्याकडे नगर विकास खाते असताना एक अध्यादेश काढण्यात आला.
या अध्यादेशानुसार 1900 सालापासून पुणेकरांना मिळणारी घरपट्टीतील सवलत रद्द करण्या आली आहे. केवळ सवलतच रद्द केली नाही तर 1300 सालापासून सन 2018 पर्यंत मिळालेली सवलत व्याजासहित पुणेकरांकडून वसूल करा असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आपण वारंवार आश्वासन देऊन ही आता पुणेकरांना नोटीस येऊ लागल्या आहेत. 40 टक्के सवलत पुणेकरांना मिळाली पाहिजे. चंद्रकांत दादा आपण पालकमंत्री असून आपण पुणेकरांना वाचवा,” असं या पत्रात म्हटले आहे.
“महानगरपालिकेने राज्य सरकारकडे जो प्रस्ताव पाठवला होता तो अद्याप मान्य झालेला नाही. त्यामुळे यावर्षी प्रत्येक करदात्याला घरपट्टीमध्ये 2018 पासूनची थकीत रक्कम समाविष्ट करून बिल येत आहेत. पुणेकरांची ही सरळ सरळ फसवणूक व अन्याय करणारी आहे. ज्या मध्यमवर्गाने व गरिब माणसाने कर्ज काढून घर विकत घेतली आहेत अशा नागरिकांस घरपट्टी भरण्यासाठी स्वतःचे घर गहाण ठेवावे लागेल अथवा विकावे लागेल.” असेही पत्रात नमूद केले आहे.
“दादा, तुम्ही कोल्हापूरला असताना तेथील नागरिकांसाठी 350 कोटी रुपयांचा टोल माफ केला होता. ते पैसे सरकारने भरले होते. सध्या तुम्हाला पुणेकरांनी आमदार केले आहे त्यांच्या बाबतीत दुजाभाव करू नका. आपण पुण्याचे पालकमंत्री आहात,आणि गेल्या चार वर्षांपासून पुणेकर आहोत असा आमचा समज आहे. पुणेकर नागरिकांना या शुक्लकाष्टातून आपण शब्द दिल्याप्रमाणे वाचवावे ही पुणेकरांच्यावतीने विनंती आहे,” असे बालगुडे यांनी लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे.