दीपक खिलारे
इंदापूर : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत देशभर राबविली जात असलेली आयुष्यमान भारत योजना ही सर्वसामान्य गरीब जनतेसाठी आरोग्य कवच आहे, असे प्रतिपादन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
आयुष्यमान भारत योजनेचे गोल्डन कार्ड जनतेला उपलब्ध होणेसाठी इंदापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवार (ता.५) ते सोमवार (ता.६ मार्च) या दरम्यान ९ ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी पाटील यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला व शिबिरासाठी परिश्रम घेणारे भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आयुष्मान भारत ही योजना पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी २५ सप्टेंबर २०१९ पासून देशभर लागू करण्यात आली. या योजनेमुळे ग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटूंबातील सदस्यांना आरोग्य विमा उपलब्ध झाला आहे.
या आयुष्मान भारत योजनेत प्रत्येक कुटंबाला प्रतिवर्षी रु. ५ लाख पर्यंतच्या वैद्यकीय विम्याचा लाभ मिळत आहे. त्यामुळे गोल्डन कार्ड धारकांना रु. ५ लाख पर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचा आकार व कोणतेही बंधन नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
इंदापूर शहरात ९२५० इतके पात्र लाभार्थी आहेत तर इंदापूर तालुक्यामध्ये ९१ हजार इतके पात्र लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना मार्च महिना अखेर पर्यंत आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड दिले जाणार आहे. देशातील सुमारे ५० कोटी नागरिकांचा योजनेतील पात्र लाभार्थ्यांमध्ये समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील ६८ हॉस्पिटलचा योजनेमध्ये समावेश असून इंदापूर, अकलूज शहरातील काही हॉस्पिटलचा सध्या समावेश झालेला आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिली.
इंदापूर शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठिकठिकाणी आयोजित आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यासाठी शिबिरांचा शुभारंभ प्रसंगी शहरातील तुळजाभवानी मंदिर अंबिकानगर, सावतामाळी मंगल कार्यालय सावतामाळीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिकभवन आंबेडकरनगर, शिवसेना भवन श्रीराम सोसायटी , दत्त मंदिर समोर अष्टेकर ज्वेलर्स शेजारी खडकपुरा , श्रीराम मंदिर रामवेसनाका , गणपती मंदिर सरस्वतीनगर , व्यंकटेश मंदिर व्यंकटेशनगर ,नामदेव मंदिर कासारपट्टा येथे करण्यात आले होते. त्यास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.