पुणे : एमएसईबी ऑफीसमधून बोलत असल्याचे सांगून एका महिलेच्या बँक खात्यातून अज्ञाताने १ लाख ७५ हजार ५७० रुपये ट्रान्सफर करून घेतल्याची घटना भोसरी येथील पांजरपोळ येथे घडली आहे.
याप्रकरणी ४६ वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 9749722838 आणि 9749722838 या मोबाईल धारकांविरुद्ध आयपीसी ४१९ , ४२० सह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अज्ञात व्यक्तीने फोन करुन एमएसईबी ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे लाईटबील तुम्ही भरले नाही. त्यामुळे मीटर कट होणार असल्याचे मेसेज पाठवले. तसेच मेसेजद्वारे एक लिंक पाठवून क्विक सपोर्ट नावाचे स्क्रिन शेअरिंग अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्यानंतर, समोरच्या व्यक्तीने सांगितल्या प्रमाणे फिर्यादी यांनी अॅप्लिकेशन डाऊनलोड केले. यानंतर फिर्यादी यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ७५ हजार ५७० रुपये परस्पर ऑनलाईन ट्रान्स्फर करुन फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे महिलेचे लक्षात येताच त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.