पुणे : शहरातील कोंढवा भागात पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घातला त्यातूनच पत्नीला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत महिलेच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. . ही घटना कोंढव्यातील भाग्योदयनगरमधील गल्ली नं. ३२ येथे रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात २७ वर्षीय विवाहितेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी 31 वर्षीय व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व तक्रारदार हे पती पत्नी असून आरोपी हा नेहमी तक्रारदाराच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यावरून या दोघांमध्ये अनेकदा वाद होत असे त्यावरुन तक्रादाराशी वाद घालून त्यांना शिवीगाळ करुन मारहाण करीत असे.
दरम्यान रविवारी दुपारी त्याने भांडण उकरुन काढले. तक्रारदार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्यांच्या नाकावर हाताने जोरात ठोसा मारला. तोंडावर लाथ मारली. त्यामुळे त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असून त्या गंभीर जखमी झाल्या.
पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.