पुणे : जिल्ह्यातील जुन्नर येथे बिबट्या सफारीसाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यासाठी तरतूद होण्याची दाट शक्यता आहे. याबाबतचे सूतोवाच वन विभागातील अधिकाऱ्यांनी केले आहे. बिबट्या सफारीच्या संकल्पनेनंतर प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या. त्यासाठी आंबेगव्हाण येथे जागा वन विभागाद्वारे निश्चित केली गेली.
या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार झाला आहे. या आराखड्यानुसार सफारीसाठी अर्थसंकल्पात तरतुद केली जाणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने जुन्नर बिबट्या सफारीच्या डीपीआरसाठी तरतूद करून तो अंतिम केला आहे. आता या डीपीआरसाठी येत्या अर्थसंकल्पात मोठ्या निधीच्या तरतुदीची अपेक्षा जुन्नरकरांना आहे.
जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर या तालुक्यांमध्ये बिबटे आहे. तसेच नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, श्रीगोंदा आणि पारनेर या तालुक्यांमध्ये बिबटे आहेत. हे बिबटे अनेक वेळा मानवी वस्तीत येऊन धडकतात. यामुळे मानवी मृत्यूंसह पशुधनाचा देखील मृत्यूच्या घटना घडतात. या भागांतील उसाच्या शेतात हे बिबट्यांचा वावर असतो.
मानवी वस्तीपर्यंत आलेल्या या बिबट्यांना एकत्र करत बिबट्या सफारीची संकल्पना मांडली गेली. माजी आमदार शरद सोनवणे यांनी २०१८ मध्ये प्रथम ही कल्पना मांडली होती.