पुणे : ‘हू इज धंगेकर’ आता आपल्याला सर्वांना माहितीच झाले आहे. कसबा निवडणूकीमध्ये घासून नाही तर ठासून येवून, पोटनिवडणुकीत भापजला पराभवाची धुळ चारलेले कसबा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यातील शिवाजीनगरातील मोदी बाग येथील निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेस पक्षाचे नेते मोहन जोशी आदी उपस्थित होते. दरम्यान शरद पवारांनी आमदार रवींद्र धंगेकरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे झालेल्या कसबा मतदार संघाची पोटनिवडणुक झाली. कसबा मदार संघ भाजपचा बालेकिल्ला समजला जात असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. मात्र भाजपने सर्व शक्तीपणाला लावूनही विजय राखता आला नाही.
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी १० हजार ९४० मतांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. कसबा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होताच धंगेकर यांनी केसरीवाडा येथील मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी जाऊन टिळक कुटुंबीयांची भेट घेतली होती. तसेच त्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते विद्यमान खासदार गिरीश बापट यांचीदेखील दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती. यावेळी गिरीश बापट यांनी धंगेकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या होत्या.