युनूस तांबोळी
शिरूर : उन्हाळ्याच्या सुरवातीला वणवा हे अलीकडच्या काळात समीकरणच बनले आहे. मात्र हा वणवा नैसर्गिक रित्या लागत असल्याने काहींचा अपप्रवृत्तीचा विकृतपणा निसर्गाच्या जिवावर उठल्याचे चिन्ह संपुर्ण राज्यात पहावयास मिळते आहे.
बहुतेक ठिकाणी आधीचे गवत जाळून नवीन यावे या गैरसमजातून सुशिक्षीत लोकही निसर्गाला हानी पोहचवतात. वनविभागाने वणवे लागण्याच्या सुरवातीलाच कडक कारवाई करून वणवा सत्र वेळीच रोखण्यासाठी अॅक्शन मोडमध्ये येण्याची गरज आहे. काही ठिकाणी तरूण मंडळी पुढाकार घेऊन वणवा विझवतानाही दिसत आहे. मात्र आग विझविणाऱ्या पेक्षा आग लावणारे जास्त झाल्याने कायद्याचा धाक बसण्यासाठी कारवाई आवश्यक आहे.
राज्यात सह्याद्रीच्या डोंगररांगा पहावयास मिळतात. या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस सर्वत्र झाल्याने या डोंगररांगावर निसर्गाने हिरवाई नटवली होती. त्या बरोबर राज्यातील वृक्षसंपदा ही मोठी असल्याचे पहावयास मिळते. अनेक ठिकाणी विकासाची कामे हाती घेतल्याने वृक्षांची तोड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. ही वृक्षसंपदा तयार होण्यासाठी नवीन झाडे येण्यास कित्येक वर्षाचा कालावधी लोटला जातो. देशी झाडे संवर्धन व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आवश्यक जैवविविधता ही सध्या जंगलात व डोंगरामध्येच असल्याचे दिसून येते. मात्र वणव्यामुळे ही नैसर्गिक संपत्ती नष्ट होत चालली आहे.
कोकणातील नैसर्गिक संपदा पासून तर साधारण जिरायत भागापर्यंत डोंगर हे पहावयास मिळतात. साधारण डोंगर असणाऱ्या भागात सध्या तरी डोंगर काळे झाल्याचे दिसून येतात. याचे कारण म्हणजे येथे लागलेला वणवा. मग या ठिकाणी किटक, मुंगी पासून या डोंगरमाथ्याला वावरणारे पक्षी, प्राणी यांची मोठी वाताहत होत असते. असा वणवा लागला की त्यांनी उबवलेली अंडी असेल किंवा त्यांची पिलावळ असेल हे पुर्णतः नष्ट होते. यातून त्यांचे भविष्यच नष्ट होत असल्याने नैसर्गीक संकट येत असल्याचे चित्र आहे. नैसर्गीक साखळी असणारी प्रत्येक गोष्ट इतरांवर जगत असल्याने ही अन्न साखळी तोडली जात असल्याचे दिसून येते.
बिबट, गवे, रानडुक्कर, हरणे, यासारखे प्राणी या वणव्यामुळेच गावात घुसून पिकाचे नुकसान करतात.पुणे जिल्ह्यात ऊसाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. सध्या ऊसाची तोडणी करताना तो ऊस पेटवून दिला जातो. त्यामुळे त्या भागातील नैसर्गीक जीवजंतू मरू लागले आहेत. बिबट सारखा प्राणी सैरवेर होऊ लागला आहे. त्यातून पाळीव प्राण्यांवरील हल्ले व मानव वस्तीत त्याचा धुडगूस पहावयास मिळू लागला आहे. जंगल, डोंगर, टेकडीच्या परिसरात फेब्रुवारी महिण्यानंतर अचानक रात्रीच्या वेळी जंगलांना आग लागत असते. नैसर्गीकरीत्या आग ही दिवसा लागते.
दरम्यान, उपद्रवी लोकांना वणवा लावल्याबद्दल कठोर शिक्षा दिल्यास वणव्याला पुन्हा सामोरे जावे लागणार नाही. समृद्ध जंगल निर्माण होण्यास हातभार लागेल. वणव्यामध्ये जंगलात नव्याने उगवण झालेली झाडी, झुडपे, पक्षांची घरटी, अंडी, नवजात पिल्ले, सरपटणारे प्राणी जळून खाक होतात. त्यातून अनेक वृक्षसंपदा व पशुपक्षी किटक यांचे अस्तित्व कायमचे नष्ट झाले आहे. निसर्गप्रेम हे केवळ बोलण्यातून नव्हे तर कृतीतून जास्त दिसायला हवे. त्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलून विकृत प्रवृत्तीना जागीच ठेचायला हवे. अशी मागणी पर्यावरण प्रेमींमधून मोठ्या प्रमाणावर होत आहे.
वणवा रोखण्यासाठी वनविभागातर्फे जाळ रेषेसह विविध योजना राबवल्या जात आहेत. ग्रामस्थांसह स्थानिकांचे सहकार्य आवश्यक आहे. वणवा लावणे हा कायद्याने गुन्हा आहे. आरोपीस दोन वर्षाचा कारावास व 5000 दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. कुठेही वणवा लागल्यास वन विभागाला माहिती द्यावी. वणवा लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
मनोहर म्हसेकर
वन अधिकारी शिरूर
निसर्गाच्या ठेवा जंगल आणि डोंगर माथ्यावर पहावयास मिळतो. निसर्गाचा आनंद त्यामध्ये दडलेला असतो. वृक्ष आणी त्यासोबत असणारी वेली, फुले यांच्या विश्वासावर पक्षी आपली घरटे बनून प्रजनन करतात. वणव्याने या पक्षांचा आधार तुटतो. ते सैसभेर होऊन निसर्गातील अन्नसाखळी तुटते. निसर्ग वाचवायचा असेल तर आपण वणवा लागणार नाही. अशी काळजी घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
आर. एस. कापसे माजी मुख्याथ्यापक व पक्षी प्रेमी जय मल्हार हायस्कूल जांबूत
उन्हाळा येतोय, निसर्गातील पाण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यातून आपल्या जवळच्या पशु पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यासाठी घरावर, छतावर पक्षांसाठी पाणी उपलब्ध करून द्या. जंगलात, डोंगरावर वणवे लागणार नाही. याची काळजी घ्या.
डॅा. विकास शेळके
संस्थापक अध्यक्ष, महागणपती स्कूल रांजणगाव गणपती