पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गॅंगसह टोळक्यांनी दहशत माजवली आहे. दहशतीसाठी टोळक्याकडून सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशीच एक घटना शहरातील सिंहगड रस्त्यावरील धायरी येथून समोर आली आहे. टोळक्याने तरुणाला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत कुऱ्हाडीचा धाक दाखवून धमकावले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत एक तरुण जखमी झाला आहे.
याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीसांनी सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भूषण मोहिते (वय २०, रा. धायरी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत मोहिते याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून टोळक्यावर गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण मोहिते आणि त्याचा मित्र धायरीतील गणपती मंदिर परिसरात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी अभिषेक हजारे आणि साथीदार तेथे आले. भूषण आणि त्याच्या मित्राला आरोपींनी कुऱ्हाडीचा धाक दाखविला. या भागात परत दिसायचे नाही, असे म्हणत त्याला मारहाण केली. पुढील तपास पोलीस तपास करत आहेत.