खेड : ऊस तोडणी सुरु असताना बिबट्याचे दोन बछडे आढळल्याने ऊस तोड कामगारांनी ऊस तोडणी थांबवली आहे. अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील शेतकरी यशवंत हिंगे यांच्या शेतात ही पिल्ले आढळली आहेत. वन विभाग आणि रेस्क्यू टीम सदस्य तात्काळ दाखल झाले असून, दोन्ही बछडे ताब्यात घेतले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अवसरी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत शेतकरी यशवंत हिंगे यांची शेती आहे. या शेतीत ऊस असून या उसाची तोडणी सुरु आहे. ऊस तोडणी सुरु असताना तोडणी कामगारांना बिबट्याचे दोन पिल्ले आढळल्याने ऊस तोडणीकामगार तात्काळ तिथून बाजूला गेले.
हिंगे यांनी गावातील रेस्कू सदस्य जयेश शहा यांना फोन केले असता शहा यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्याशी संपर्क साधून तात्काळ वन विभागाचे कर्मचारी व रेस्क्यू सदस्य दाखल झाले.
दरम्यान, वनपाल प्रदीप कासारे, वनरक्षक सूर्यकांत कदम, वनमजूर अरुण खंडागळे, रेस्क्यू सदस्य जयेश शहा, मनोज तळेकर, सुनील हिंगे, संतोष हिंगे, बंडू हिंगे, मनोज हिंगे आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून दोन्ही बछड्यांना मादीच्या स्वाधीन करणार असल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले.