नंदूरबार : केलेल्या कामाची बिले मिळणे व नवीन कामांची कार्यारंभ आदेश काढण्यासाठी तब्बल ४३ लाखांची लाच मागितली गेली. त्यापैकी साडेतीन लाख रुपयांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश प्रतापराव पाटील (वय ५१, मुळ रा. नाशिक ) असे त्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासकीय नोंदणीकृत बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांनी गेल्या सहा महिने ते एक वर्षाच्या कालावधीत नंदूरबार जिल्ह्यात प्रमुख जिल्हा मार्ग, प्रमुख राज्य मार्ग अशा विविध रस्त्यांच्या नवीन डांबरीकरणाची व डागडुजीची कामे पूर्ण केली आहेत. तसेच सध्याच्या कालावधीत तक्रारदार यांच्या तीन नवीन कामांच्या निविदा मंजूर होऊन त्यांचे कार्यारंभ आदेश धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी शहादा कार्यालयात पाठविले होते.
त्यानंतरही महेश पाटील हे कार्यारंभ आदेश काढत नव्हते. तकारदार यांनी पूर्ण केलेल्या कामांबाबतची ३ कोटी ९२ लाख ७९ हजार २८५ रुपयांची एवढी बिलाची प्रलंबित रक्कम काढणे व या व्यतिरिक्त प्रस्तावित असलेल्या तीन कामांचे ५ कोटी ३३ लाख रुपये एवढ्या कामाच्या रक्कमेचे कार्यारंभ आदेश काढावेत, यासाठी त्यांनी महेश पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला.
तेव्हा त्यांनी बिले काढण्यासाठी १० टक्के तर तिन्ही कार्यारंभ आदेश देण्यासाठी ०.७५ ते १ टक्का अशा टक्केवारीच्या स्वरुपात एकत्रित ४३ लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी याची तक्रार नाशिक लाच लुपचत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार तक्रारीची पडताळणी केली असता त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहादा येथील पाटील याच्या शासकीय निवासस्थानी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून साडेतीन लाख रुपये स्वीकारताना महेश पाटील याला पकडण्यात आले.