पुणे : पुणे विभागात मागील ११ महिन्यांच्या कालावधीत रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्या तब्बल तीन लाखांहून अधिक प्रवाश्यांकडून रेल्वेने २२ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे.
एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या ११ महिन्यांच्या कालावधीतील विनातिकीट प्रवाशांवरील दंडात्मक कारवाईची आकडेवारी रेल्वेच्या पुणे विभागाने जाहीर केली आहे. विनातिकीट प्रवाशांची संख्या ३ लाख १२ हजार १५९ आहे. त्यांच्याकडून २२ कोटी ५२ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. फेब्रुवारी तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान २० हजार ५३७ प्रवासी विनातिकीट आढळले. त्यांच्याकडून १ कोटी ७३ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला.
फेब्रुवारी महिन्यात अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ६ हजार ८४३ आहे. त्यांच्याकडून ४० लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. याचबरोबर सामानाची नोंदणी न करता तसेच घेऊन जाणाऱ्या १७१ जणांकडून १९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून नियमितपणे तिकीट तपासणी मोहीम सुरू आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असेही झंवर म्हणाले.