दीपक खिलारे
इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे ह्या गुरुवारी दि.2 इंदापूर तालुक्यातील वडापुरी गटात नियोजित दौऱ्यावर येणार आहेत. या वेळी त्यांनी वडापुरी गटातील वडापुरी अवसरी या रस्त्यावरुन म्हणेजच झंडु बाम रस्त्याने जाण्याचा सल्ला भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार यांनी खा.सुळे यांना दिला आहे.
ॲड.शरद जामदार पुढे म्हणाले की, गेल्या सहा ते सात वर्षांपासून इंदापूर तालुक्यात अवसरी- वडापुरी हा रस्ता रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे येथील नागरिकांकडून या रस्त्याला झंडु बाम रस्ता असे म्हटले जाते. या झंडु बाम रस्त्याने जाताना शाळकरी मुले, वृद्ध व शेतकरी यांची अडचण होत आहे. असे असतानाही तालुकक्याचे आ. दत्तात्रय भरणे यांनी जाणिवपूर्वक या रस्त्याची दुरुस्ती केली नसल्याचा जामदार यांनी आरोप करुन दौऱ्याच्या वेळी खा. सुप्रिया सुळे यांनी या रस्त्यावरुन फिरावे म्हणजे तालुक्यात काय विकास झाला हे त्यांना समजेल.
बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढत चालली असल्याने खा.शरद पवारांच्या पायाखालची वाळू सरकत चालल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेस कडून इंदापूर तालुक्यात दौरे वाढले असल्याचेही ॲड.शरद जामदार म्हणाले.
दरम्यान, तालुकाध्यक्ष ॲड. शरद आमदार यांनी अवसरी वडापुरी रस्त्याने जाण्याचा सल्ला सुप्रियाताई यांना दिल्यानंतर सुप्रियाताई या रस्त्याची पाहणी करणार का? व रस्त्याचे काम त्वरित चालू होऊन पंचक्रोशीतील लोकांना “झेंडू बाम”या रस्त्यापासून दिलासा मिळणार का? हे पाहण्याजोगे ठरणार आहे.