युनूस तांबोळी
शिरूर : कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, कांद्याला बाजार भाव मिळालाच पाहिजे, कापसाला बाजार भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला दिवसा वीज मिळालीच पाहिजे, वीज तोडणी करू नका, शेतमालाला बाजार भाव व आधारभूत किंमत मिळालीच पाहिजे… या घोषणा देत राष्ट्रीय समाज पार्टी व जनता दल (सेक्युलर ) व मित्र पक्षाच्या वतीने पुणे नगर महामार्गावर केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांचा निषेध करत महामार्गावर कांदे टाकून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी पुणे अहमदनगर महामार्गावरील शिरूर जवळच्या न्हावरे फाटा येथे केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी महामार्गावर कांदे टाकून रास्ता रोको करण्यात आला. शिरूरचे नायब तहसीलदार महेश काळेगावकर यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे,तालुका अध्यक्ष शिवाजी कु-हाडे, जिल्हा संघटक तान्हाजी शिंगाडे, जनता दल जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, शिवाजी खेडकर,रासपा नेते रामकृष्ण बिडगर, शिरूर -आबेगाव विधानसभा अध्यक्ष किरण शिंदे, उपाध्यक्ष संताजी तिखोळे आदी उपस्थित होते.
यावेळी न्हावरे फाटा येथे पुणे नगर रस्ता काही काळ आंदोलकांनी अडवून धरल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी वर्ग अर्थिक संकटात आला आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना वीज बिल, कर्ज माफ करणे गरजेचे आहे. या विरोधात कोणतेही प्रस्थापित पक्ष आवाज उठवत नसल्यांची खंत त्यांनी व्यक्त केली.
शिरूर तालुक्यात बिबट्याचे प्रमाण वाढले असुन गावोगाव बिबटे मनुष्य व पशुधनावर हल्ले करीत आहेत. यामुळे बिबट्यापासुन संरक्षण मिळावे यासाठी वन विभागाने कायम स्वरूपी प्रतिबंधक उपाय योजना करण्याची गरज आहे .बिबट्याच्या भितीमुळे शेतीला सुर्योदय ते सुर्यास्तापर्यंत वीज मिळावी, कांद्याला हमी भाव द्यावा, मेंढपाळांना चराऊ कुरणे द्यावीत, राज्यात विविध ठिकानी मेंढपाळावर हल्ले होत असुन त्यांना संरक्षण मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.