अजित जगताप
वडूज : सातारा जिल्हा परिषदेच्या खटाव तालुक्यातील दरजाई प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याना बेंच असून देखील फरशीवर बसविण्यात येत असल्याचा प्रकार निदर्शनास आला असून या प्रकाराविषयी अनेक ग्रामस्थ तथा माजी पंचायत समिती सदस्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.
पहिली ते चौथी अशी ही शाळा असून पटसंख्या ३३ आहे. शाळेच्या नूतन खोलीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या शाळेसाठी दरजाई येथील रहिवासी असलेले मात्र सध्या मुंबईत राहत असलेल्या काही व्यक्तीने बेंच उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, त्याचा वापर अजूनही केला जात नाही. बेंचचा वापर करू नये अशी तोंडी सूचना खटाव गटशिक्षणाधिकारी दिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
शाळेसाठी संरक्षण भिंतींचे कामाच्या संदर्भात देखील प्रस्ताव पाठवण्यात आला होता, यासाठी निधीही देखील तरतूद करण्यात आली होती. मात्र, ते काम पुढे गेले नाही. तसेच गावामध्ये पाण्याचा तुटवडा असल्याने शाळेतील जलशुद्धीकरण यंत्रणा देखील बंद स्थितीत आहे. त्यामुळे शाळेच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्यात यावे, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार गोडसे, मोहन पाटोळे, विजय पाटोळे, विठ्ठल बोटे, राहुल कदम, निलेश सत्रे व ग्रामस्थांनी केली आहे.