नारायणगाव, (पुणे) : मेंढपाळ महिलेवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना ओतूर (ता. जुन्नर) ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. २१) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
मंगल विजय सोडणर (वय – २६) असे जखमी महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओतूर ग्रामपंचायत हद्दीत मंगल सोडणर या मेंढ्यांच्या कळप असलेल्या ठिकाणी बसल्या होत्या. यावेळी अचानकपणे बिबट्या आला व त्याने मंगल याच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या.
सदर घटनेची माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक, जुन्नर, अमित भिसे यांच्या मार्गदर्शनानुसार ओतूर वन परिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, वनपाल सुधाकर गिते, वनरक्षक सुदाम राठोड, वन मजूर फुलचंद खंडागळे व साहेबराव पारधी यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, मंगल सोडणर यांना ओतूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.