सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील तिहेरी खून प्रकरण हे शेतीच्या बांधावरुन तसेच पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून आणखी माहिती घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.
समाधान महादेव लोहार (वय ३३, रा. नंदेश्वर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यास मंगळवेढा पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्याला मंगळवारी (ता. २८) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
दीपाली बाळू माळी (वय २५ वर्षे), पारूबाई महादेव माळी (वय ५५ वर्षे), संगीता महादेव माळी (वय ४७ वर्ष) अशी मृत महिलांची नावे आहेत. नंदेश्वर गावात बुधवारी (ता. २३) अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नंदेश्वर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू व दत्ता ही दोन मुले आहेत. बाळू माळींचा विवाह दीपाली सोबत झाला आहे. दत्ता माळी हा अविवाहित आहे. महादेव माळी यांच्या आईचे दहा दिवसांपूर्वी निधन झाल्याने माळी कुटुंबीय दुःखात होते. गुरुवारी तेरावा होणार असल्याने संगीता व पारुबाई या माहेरी आल्या होत्या. महादेव माळी हे हॉटेल व्यवसाय करतात.
मंगळवारी (ता. २१) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सुमारास मोजे नंदेश्वर लवटे वस्ती येथे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून हत्याराने व दगडाने मारुन तीन महिलांचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली होती. आजुबाजुच्या लोकाकडे सदर खुन कोणत्या कारणासाठी, कशामुळे कोणासोबत पुर्वीची भांडणे होती, काय अशा सर्व बाबीच्या अनुशंगाने तपास केला व गोपनीय बातमीदाराच्या मार्फतीने चौकशी करुन संशयीत समाधान लोहार यास ताब्यात घेतले. चौकशीत प्रथम गुन्हा केला नसल्याचे सांगीतले. परंतु तेथील परस्थितीजन्य पुराव्याच्या व गोपनीय माहितीच्या आधारे त्याच्याकडे पोलीसांनी कसून चौकशी केली असता त्यांने गुन्हा केल्याचे कबुली दिली
दरम्यान, लवटे वस्ती येथे माळी कुटुंबाची दहा एकर शेती आहे. त्यांच्या शेताच्या बाजूलाच लोहार कुटुंबाची पाच एकर शेती आहे. दोन्ही शेताच्यामध्ये बांध आहे. या बांधावर लिंबाची झाडे आहेत. या झाडांवरून माळी व लोहार कुटुंबात वाद होत होता. गावपातळीवर ग्रामस्थांनी बैठक घेऊन हा वाद चार वर्षांपूर्वी मिटवला होता. संशयित आरोपी समाधान लोहार हा अविवाहित तरुण आहे. लग्न होत नसल्याने त्याच्या स्वभावात चिडचिडेपणा आला होता. समाधान लोहार याने मंगळवारी दुपारी दीपालीची छेड काढत तिचा विनयभंग केला असेल. यावरून वाद वाढला आणि हे हत्याकांड झाले असेल, अशीही चर्चा नंदेश्वर गावात दबक्या आवाजात सुरू आहे.