सागर जगदाळे
भिगवण : पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातून वाहन चोरी व घरफोड्या करणाऱ्या सराईत शिकलकर टोळीतील तिघांना भिगवण पोलिसांनी तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथून जेरबंद केले आहे.
जितसिंग राजपालसिंग टाक (वय-२६, रा. वैदवाडी, हडपसर), लकीसिंग गवरसिंग टाक (वय-२०, रा. यवत, ता. दौंड) व एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. त्यांनी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, इंदापूर, भिगवण, व हवेली परिसरात केलेल्या वाहनचोऱ्या व घरफोड्यांचे एकूण ४० गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या महितीनुसार, भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक चारचाकी गाडी चोरी गेली होती. हि गाडी चोरटे तुळजापुर येथील देवीच्या दर्शनाला घेऊन गेले आहेत अशी माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना चारचाकी गाडीसह जेरबंद केले.
दरम्यान, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, इंदापूर, भिगवण, व हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४० गंभीर गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. भिगवण पोलिसांची आजपर्यंतची सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे.
भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, विनायक दडस पाटील, पोलीस अंमलदार समीर करे, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, सचिन निकम यांच्या पथकाने केली आहे.