पुणे : विश्रांतवाडीत बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने मंगळवारी (ता.२१) छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर १७ जणांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर मटका जुगार सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने सदर ठिकाणी टाकला. तेव्हा काही व्यक्ती मटका जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिस पथकाने १६ जणांना ताब्यात घेतले. तर तेथून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूण सुमारे २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी १७ जणांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर ताब्यात घेतलेल्या १६ जणांना सामाजिक सुरक्षा विभागाने पुढील कारवाईसाठी विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, तुषार भिवरकर, मनिषा पुकाळे, इम्रान नदाफ, इरफान पठाण, हणमंत कांबळे, संदिप कोळगे आणि अमित जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.