शिरुर : तमाशा पहायला गेला अन् चोरट्याने घरातील रोख रकमेसह पावणे २ लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे सोमवारी (ता.२०) रात्री १ वाजल्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
याप्रकरणी ज्ञानोबा संताराम शेरे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानोबा शेरे हे पत्नी व मुलगी यांच्यासह घरात सोमवारी झोपले होते. तर मुलगा श्याम हा मांडवगण फराटा येथे तमाशा पहाण्यासाठी गेला होता. तो रात्री उशीरा येईल म्हणुन त्यांनी स्वयंपाक घराचा दरवाजा आतून लावला होता. तर दुसऱ्या खोलीचा दरवाजाची कडी न लावता ढकलुन ते झोपी गेले.
दरम्यान, दरवाजा उघडा असल्याचे पाहून चोरट्यांनी डाव साधला आणि स्वयंपाक खोलीत असलेल्या लोखंडी पेटीतील ७० हजार रोख रक्कम व सोन्याचे २ तोळयाचे दागिणे असा एकूण सुमारे १ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष खबाले करीत आहेत.