दौंड : दौंड तालुक्यातील बोगस शिक्षण संस्थांना आळा घालणारे पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी किसन भुजबळ यांचा पदभार काढून घेण्यात आला आहे.
त्यामुळे दौंडसह परिसरातील पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे काही शिक्षक, राजकीय पुढार्यांच्या वरदहस्ताने आणि राजकीय शिक्षण संस्था चालकांच्या हट्टापायी एका कार्यक्षम आणि प्रामाणिक कामकाज करणारे गटशिक्षणाधिकारी किसन भुजबळ हे राजकारणाचे बळी पडले असल्याची चर्चा दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे.
किसन भुजबळ यांनी ७ एप्रिलला प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला होता. या ११० दिवसात त्यांनी बोगस शिक्षण संस्थांना लगाम लावून पाच शिक्षण संस्थांना टाळे ठोकले तर तीन शिक्षण संस्थांकडून १४ लाख रुपयांचा दंड आकारण्यासंदर्भात संबंधित शिक्षण संस्थांना नोटीसा पाठवल्या होत्या.
तसेच कामकाजात चुकारपणा करणाऱ्या काही शिक्षकांना सूचना देखील दिल्या होत्या. परिणामी अचानक कुठल्याही शाळेला भेटी देणाऱ्या किसन भुजबळ यांचा एक अंकुश दौंड तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेवर बसला होता.
दरम्यान, राजकीय संधान बांधून काही शिक्षक, पुढारी व संस्थाचालकांनी किसन भुजबळ यांच्या तक्रारी केल्यामुळे एक कर्तव्यदक्ष अधिकारी राजकारणाचा बळी पडल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांत नाराजीचा सूर पसरला आहे. ११० दिवसात पदभार काढून घेण्यात आल्याने पालक वर्गात संतापाची लाट पसरली असून गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीमुळे पालक आंदोलन करणार असल्याची माहिती मिळत आहे.