पुणे : पोलीस तक्रारीची दखल घेत नसल्याने एका माथेफिरूने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचे तब्बल ७ वेळा फोन करून पोलीस कंट्रोल रुमला सांगितल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता.१७) आणि शनिवारी (ता.१८) रात्रीच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या छडा लावून फोन करणाऱ्याला अटक केली आहे.
रवींद्र तिवारी (रा. दयालपूर, दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचा फोन एका व्यक्तीने १०० या क्रमांकावर केला. पोलीस कंट्रोल रुममध्ये आलेल्या ७ कॉल्समुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले. तसेच मोदींच्या निवासस्थानात अनेक ठिकाणी बॉम्ब आपण स्वतः ठेवल्याचा दावा हा फोन करणारा व्यक्ती करीत होता. यामुळे पंतप्रधानांच्या घराला सुरक्षा यंत्रणेकडून घेरण्यात आले. तसेच बॉम्ब विरोधी पथकाने एकेक कोपरा शोधून काढला पण बॉम्ब सापडला नाही. त्यानंतर दिल्ली पोलिसांकडून आरोपीचा मोबाईल नंबर ट्रॅक करून आरोपीला पकडले.
दरम्यान आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली असता, त्याने धक्कादायक खुलासा केला. तीन वर्षांपासून मोठा भाऊ बेपत्ता असून त्याच्या पत्नीचे इतर कोणाशी संबंध आहेत, याबाबतीत पोलीस कोणतीच कारवाई करत नसल्याने आपण पोलिसांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे आरोपीचे म्हणणे आहे.