पुणे : पुणे महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. महापालिकेने नियमित कर भरणा करणाऱ्या एका व्यावसायिकाची सदनिका सील केल्यामुळे चोर सोडून संन्याशाला शिक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण घोडके हे मार्केटयार्डमध्ये एक अडतदार असून त्यांची एक सदनिका पर्वती परिसरात आहे. ही सदनिका पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाने कराच्या थकबाकीपोटी सील केली होती. जेव्हा हा प्रकार अरुण घोडके यांच्या लक्षात आल्यानंतर मात्र त्यांनी कपाळाला हात लावला.
महानगरपालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाने पर्वती भागातील थकबाकीदारांची यादी काढली होती. यामध्ये मेहता नावाच्या एका इसमाची सदनिका असून ज्यावर मोठी थकबाकी आहे. परंतु, मेहता यांची सदनिका पालिकेच्या अधिकाऱ्यांना सापडली नाही. त्यामुळे कारवाईच्या दबावाखाली अधिकाऱ्यांनी अरुण घोडके यांची सदनिका थेट सील केली व त्यासाठी थकबाकी हे कारण दाखविले.
अरुण घोडके यांनी कर भरलेली पावती, जप्तीची नोटीस व सदनिका सील केलेले फोटो, घेवून राष्ट्रवादी अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांची भेट घेत झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर नितीन कदम यांनी हा प्रकार थेट कर आकारणी व संकलन विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिला व संबंधित कागदपत्रे कर आकारणी विभागाला पाठवून दिली.
देशमुख यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून खुलासा मागविला व जप्तीची कारवाई मागे घेण्याच्या सूचना दिल्या. यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी येवून अरुण घोडके यांच्या सदानिकेला लावलेले सील काढले.
झालेला प्रकार गंभीर असून प्रशासनाने याची कसून चौकशी करून संबंधित अधिकऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मनस्ताप सहन करावा लागलेल्या अरुण घोडके यांनी केली.