पुणे : पुणे-सातारा रोडवर अज्ञात तीन चोरट्यांनी हवेत गोळीबार करून मद्य विक्रीच्या दुकानात दिवसभर जमा झालेली ३ लाख ७८ हजार रुपयांची रोकड पळवून नेल्याची घटना रविवारी (ता. १९) रात्री पाऊणेबारा वाजण्याच्या सुमारास ही घडली.
याप्रकरणी राजगड पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड शिवापूर हद्दीमध्ये सोनल वाईन्स नावाचे दुकान आहे. हे दुकान दीपक शंकर जगदाळे (रा. गराडे ता. पुरंदर) आणि कालेश्वर अगारिया हे दोघे जण चालवतात. रविवारी संध्याकाळी दुकान बंद करून दिवसभर जमलेली ३ लाख ७८ हजार रुपयांची रक्कम पिशवीत ठेवून शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाच्या दिशेने जात होते.
मागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांच्या दुचाकीला धक्का दिला. त्यानंतर चोरट्यांनी पैशांची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावळी कालेश्वर याने चोरट्यांना विरोध केला असता त्यांनी पिस्तूल काढून दोन वेळा गोळीबार करुन पैशांची पिशवी घेऊन पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेबाबत राजगड पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे करीत आहेत.