राहुलकुमार अवचट
यवत : यवत, शिक्रापूरसह जिल्ह्यातील व अहमदनगर मधील राहुरी व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विद्युत रोहीत्रांमधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीतील तिघांना यवत पोलिसांनी राहुरी (जि. अहमदनगर) येथून ताब्यात घेतले आहे.
मामा उर्फ़ मुक्तार गफुर देशमुख, विशाल अर्जून काशीद, अभिषेक गोरख मोरे (सर्व रा. राहुरी जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. यवत पोलिसांनी त्यांच्याकडून ११ विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून आरोपींकडून पोलिसांनी एक चारचाकी गाडी ११० किलो अल्युमिनियमच्या तारा, ३५० किलो तांब्याच्या तारा, तांब्याचे त्रिकोणी ठोकळे असा एकूण ५ लाख ६७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. १० जून) पारगाव (ता. दौंड) येथील गावचे हद्दीत शहाजी रघुनाथ रूपनवर यांचे शेतातील व युवराज बोत्रे यांचे शेतातील ट्रान्सफॉर्मर डीपी कोणीतरी अज्ञात चोरट्याने २८० किलो वजनाच्या अॅल्युमिनियम तारा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्यची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती.
मंगळवारी (ता. १९) यवत पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, मारुती बाराते यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की राहुरी जि. अहमदनगर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार मामा उर्फ़ मुक्तार गफ़ुर देशमुख हा त्याचे टोळीतील साथीदाराकडुन विद्युत ट्रान्सफार्मर डीपी चोरीचे गुन्हे करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने राहुरी परिसरात राहुरी पोलीस स्टेशनचे पो.कॉ नदीम शेख यांचे मदतीने राहुरी मुलन माथा या ठिकाणी वेषांतर करुन सापळा लावुन वरील तीन आरोपींना एका चारचाकी गाडीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता सदर इसमांनी साथीदारांचे मदतीने पारगाव,कोरेगाव भिवर, मिरवडी मेमाणवाडी,करंदी , आपटी, डिग्रजवाडी, वाघाळे, भांबर्डे ,गणेगाव खालसा, शिरुर, रांजणगाव, शिक्रापुर, यवत पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण ११ रोहित्र (डीपी) चोरीचे गुन्हे केलेचे सांगितले.
दरम्यान, चोरीचा माल श्रीरामपूर येथील भंगार व्यावसायिक फिरोज रझाक शेख यास विक्री केल्याने त्यासही सदर गुन्हयाचे कामी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी वरील तीन हि आरोपींकडून चारचाकी गाडीसह ५ लाख ६७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.