राहुलकुमार अवचट
यवत : ‘ज्ञानोबा तुकाराम’चा अखंड जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर, मंदिरातील विविधरंगी फुलांची आणि लाईटच्या माळांची सजावट, रस्त्यावर काढलेल्या रांगोळीच्या पायघड्यांवरून शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये खंडेश्वर मंदिर ते स्टेशन ग्रंथ दिंडी व छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून काढलेली मिरवणूक आणि दिग्गज कीर्तनकारांच्या प्रबोधनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.
काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून महाप्रसाद देण्यात आला. त्यानंतर सात दिवसांच्या अखंड हरीनाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.
श्री निळकंठेश्वर शिवभक्त व ढमढेरे परिवार यांच्या वतीने तपपूर्ती सोहळ्यानिमित्त अखंड हरीनाम साप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आठ फेब्रुवारी रोजी सोहळ्यास प्रारंभ झाला. रोज पहाटे महापूजा, काकडा आरती, पारायण वाचन, गाथा भजन, सायंकाळी हरिपाठ, अनेक नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन व हरिजागर झाले.
हभप धनवटे महाराज यांनी व्यासपीठ चालक म्हणून काम पहिले. शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. नामांकित शिवचरित्रकार ह.भ.प प्रवीण महाराज लोळे (पानवडी) यांचे काल्याचे किर्तन झाले.
किर्तन समाप्तीनंतर दहीहंडी फोडून आरती करण्यात आली. यावेळी गेले १२ दिवस सहकार्य करणारे वरदविनायक वारकरी शिक्षण संस्था राहू, विठ्ठल समाज भजनी मंडळ, निलकंठेश्वर भजनी मंडळ, संत सावतामाळी भजनी मंडळ, चोपदार ह.भ.प. वाबळे महाराज, भोजन व्यवस्था पाहणारे पापाभाई शेख (भरतगाव) व सहकारी कल्पना स्पिकर्स ( ह.भ.प.गणेश दोरगे), साई मंगल केंद्र (सुजित गराडे), विणेकरी, अन्नदाते यांचा सन्मान करण्यात आला.
काल्याचे कीर्तनाच्या समाप्तीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले व महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम तपपूर्ती सोहळ्याची सांगता झाली.
तपपूर्ती सोहळ्यानिमित्त धार्मिक, राजकीय, सामाजिक, व्यावसायिक,पत्रकार यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर यांसह शिवभक्त, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.