पुणे : खोटा मेल पाठवून किर्लोस्कर कंपनीची २० लाख ६० हजार ८४० रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना हडपसर येथील किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी. लि. येथे घडली असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अनिकेत अरविंद देशपांडे (वय. ३८, रा. कोथरुड) यांनी शनिवारी (ता. १८) रोजी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर प्रकार १७ ऑगस्ट २०२१ ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी काम करत असलेल्या किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनीच्या मेलवर टर्बोलिंक कंपनी लि. कोरिया मधून मेल पाठवल्याचे भासवले. आरोपीने मेलमध्ये टर्बोलिंक कंपनीचा बँक खाते क्रमांक बदलला असल्याचे नमूद करुन पोर्तुगाल येथील मिलेनियम बँकेचा खाते क्रमांक देऊन त्या खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले.
त्यानुसार कंपनीने २७ हजार ८८८ डॉलर (भारतीय चलनानुसार २० लाख ६० हजार, ८४०. १६ रुपये) एवढी रक्कम आरोपीने दिलेल्या बँक खात्यात जमा केली.
तसेच आरोपीने कंपनीची फसवणूक केल्याचे समोर आल्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.