पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसचा दुचाकीला धक्का लागून झालेल्या अपघातात गराडे येथील एका ५९ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना येवलेवाडी ते खडी मशिन चौक दरम्यान घडली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १८) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रकाश मुळचंद पारख (वय ५९, रा. गराडे, ता. पुरंदर) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पवन पारख यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीएमपी बसचालक शिवाजी तनपुरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश पारख हे पुरंदर तालुक्यातील गराडे येथील रहिवासी आहेत. मुलगा पवन पारख व प्रकाश पारख हे दुचाकीवरून येवलेवाडीवरून खडी मशिनकडे निघाले होते. यावेळी वडील प्रकाश पारख हे दुचाकीवर पाठीमागे बसले होते.
त्या वेळी पीएमपी बसचालक धोकादायकरित्या बस चालवत होता. त्याने बस अचानक रस्त्यात थांबवली. त्यामुळे तक्रारदाराने त्यांच्या दुचाकीला ब्रेक लावून पीएमपी बसच्या उजव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, बसचालकाने अचानकपणे बस उजव्या बाजूला वळविल्याने दुचाकीला धक्का लागला. त्यामुळे तक्रारदार आणि त्यांचे वडील हे दोघेही रस्त्यावर पडले.
त्यानंतर बसचे उजव्या बाजूचे पाठीमागील चाक तक्रारदाराच्या वडिलांच्या डोक्यावरून गेले. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.