अजित जगताप
वडूज : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय समाज पक्षाच्या वडूज ता. खटाव येथील संपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
सातारा जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर ,जेष्ठ पत्रकार अजित जगताप, प्रमोद पावडे हनुमंत पवार, तानाजी मोरे, चैतन्य गोडसे, मोहन पवार, शिवाजी चव्हाण, सचिन इंगळे व शिव प्रेमी नागरिकांच्या उपस्थितीमध्ये प्रथम छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शौर्यबाबत अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना रा स प युवक जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर म्हणाले, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्र करून आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्यामुळे खऱ्या अर्थाने बहुजन नायक असलेले छत्रपती म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी प्रेरणास्थान आहे. आजही बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन वाटचाल केली जाते.
महिलांना शिक्षणाचे द्वार खुले करून देणारे महामानव महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची कास धरण्यास लावली तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वांनाच बहुमूल्य अधिकार दिलेला आहे. त्यामुळे या युगपुरुषांचे स्मरण करणे हे प्रत्येक बहुजनांचे कर्तव्य आहे. महिला वर्ग ज्या वेळेला हाती शस्त्र घेऊन शौर्याने आगेकूच करतात. त्या वेळेला खऱ्या अर्थाने फुले व आंबेडकर यांच्या कार्याची पोहच पावती मिळाल्याचे पाहण्यास मिळत आहे.
शिवजयंती निमित्त प्रत्येकाने घरामध्ये छत्रपती शिवरायांचे पूजन केले. वडूज नगरीतील बस स्थानकासमोर शिवभक्त बॉक्सर ग्रुपने एक आकर्षक रित्या उभारलेल्या राजवाड्यामध्ये श्री छत्रपती शिवराय यांची प्रतिमा स्थापन केली होती. तसेच शहरांमध्ये भव्य मिरवणूक काढून जय जय जय भवानी,,,, जय जय जय शिवाजी महाराज चा जयघोष केला होता. या मिरवणुकीमध्ये विशेषतः महिला वर्गांचा सहभाग मोठा दिसून येत होता. शिवभक्त युवक कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या राज्याच्या जयंतीच्या निमित्त अनेक ठिकाणी भगवा ध्वज व छत्रपतींची प्रतिमा असलेला ध्वज शहरभर उभा केला होता.
साडेतीनशे वर्षानंतर ही छत्रपती शिवराय सारख्या बहुजन उद्धार कर्त्या युगपुरुषांचा आदर्श घेऊन अनेकजण वाटचाल करीत आहेत. हेच चित्र संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसून येत असल्याची भावना रा. स. प. युवा कार्यकर्ते प्रमोद पावडे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, अनेक घरात छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वडूज नगरीत खटाव तालुक्यातील युवा नेते व अभ्यासक दुष्यंन पवार, मनोज पवार, धनंजय चव्हाण यांनी यानिमित्त सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या.