लोणी काळभोर, (पुणे) : ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष करीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, येथे विविध कार्यक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या भव्य अश्वरुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुजा करण्यात आली. येथूनच विद्यापीठ परिसरात महाराजांची पालखी आणि मिरवणूक काढण्यात आली. तसेच सनई-चौघड्यांचे मंजूळ स्वर, तुतारींच्या गगनभेदी गर्जना, ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, मर्दानी खेळ, अशा आनंदमयी वातावरणात जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ अतुल पाटील डॉ. अंजली भोईटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लोणी काळभोर ग्रामपंचायत आणि कदम वस्ती ग्रामपंचायत येथील नागरिक, एमआयटी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, “आपल्या आजूबाजूची सगळी राज्य मोगल आणि आदिलशहा, कुतबशहा यांच्या अधिपत्याखाली असताना धाडसीने हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभे केले. परकीय आक्रमणांना परतवून रयतेचे राज्य उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज आज संपूर्ण देशाचे आद्रस्थान आदरस्थान आहे.
महाराजांनी आपल्या भूमीचे रक्षण करण्याचे शिक्षण शिकवण आपल्याला दिली आजही आपल्यासमोर अनेक समस्या उभ्या आहेत, मात्र आपण खचून न जाता प्रत्येक समस्यांचा सामना केल्यास मार्ग नक्कीच मिळेल. शिवछत्रपतींचे गुण आत्मसात करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करणे हीच खरी शिवजयंती साजरी होईल, असा संदेश यानिमित्ताने त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.”