राहुलकुमार अवचट
यवत : मंगलमय वातावरण, डोक्यावर ज्ञानेश्वरी, माथ्यावर गंध, खांद्यावर भगव्या पताका, टाळ-मृदंगाच्या गजरात यवत येथील श्री निळकंठेश्वर मंदिर ते यवत स्टेशन परिसरात ज्ञानोबा माउली – तुकाराम जयघोष करीत ग्रंथ दिंडी निघाली. यावेळी महिलांचा सहभाग लक्षणीय होता. महाशिवरात्री उत्सव निमित्त श्री निळकंठेश्वर मंदिर तपपूर्ती व अखंड ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
अखंड हरिनाम सप्ताहात भजन, कीर्तन, प्रवचन, पारायण, अन्नदान, यांसह आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उत्तरार्ध सुरू असून, आज सायंकाळी ग्रंथ दिंडी निघाली. यात पारंपारिक वेशात डाेक्यावर तुळस, टाळ घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या, पालखी- ग्रंथ व छत्रपती शिवाजी महाराज रथ यासह निळकंठेश्वर मंदिर ते यवत स्टेशन दिंडीत वाटेमध्ये अनेक ठिकाणी भाविकांकडून दिंडीचे स्वागत करण्यात आले.
दिंडीचे आगमन स्टेशन येथे होताच टाळ मृदुंग गजरात ज्ञानोबा तुकाराम राधाकृष्ण राधा यासह विधी पारंपारिक भजनात ताल धरत उपसरपंच सुभाष यादव, ह.भ. प दीपक महाराज मोटे ,ह.भ.प गणेश दोरगे, राजेंद्र ढमढेरे यांसह अनेकांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला यावेळी ह भ प नाना महाराज दोरगे, रमेश ढमढेरे, गणेश ढमढेरे, विठ्ठल समाज भजनी मंडळ यांसह यवत व यवत परिसरातून अनेक भक्त यावेळी उपस्थित होते