राहुलकुमार अवचट
यवत: पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र भुलेश्वर येथे महाशिवरात्रीनिमीत्त लाखो भाविकांन शिवलिंगाचे दर्शन घेतले. सायंकाळनंतरही दर्शनासाठी भाविकांचा ओक चालूच असून रात्री बारा वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी सुरुवात केली होती.
पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शिवलिंगास अभिषेक करण्यात आला. यावेळी शिवलिंगास व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. पहाटे पाच वाजता महाआरती करण्यात आली. पाच वाजता माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धीनी जगताप यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. पहाटेपासुनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
गर्भगृहात शिवलिंगावर चांदीचे आवरण असलेली पिंड आवर केलेली आकर्षक फुलांची सजावट , दगडी नंदी व परिसरात केलेले सजावटीने सर्वत्र मंगलमय वातावरण झाले होते.
प्राचीनकालिन श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिरात दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी उसळत असून यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दर्शनासाठी हजेरी लावली.
दर्शनासाठी गर्दी होऊ नये म्हणुन मंदिराभोवती दर्शन रांग तयार करण्यात आली. माळशिरस ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली जेजुरी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मंदिर परिसरात विविध व्यक्तींच्या व संस्थांच्या मार्फत फराळाचे तर दुपारी मातंग नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मस्कु शेंडगे यांच्या वतीने लस्सी वाटप करण्यात आले. दिवसभर भाविकांची संख्या वाढत गेली. यामुळे मंदिराभोवतती भली मोठी रांग लागली.
दर्शनासाठी येणारी वाहने वन विभागातील कमानीबाहेर थांबविल्याने मंदिराभोवती वाहनांची कोंडी झाली नाही. वन विभागाचे कमानीपासून मंदिरापर्यंत विविध प्रकारची दुकाने थाटली होती.
अनुराज साखर कारखाना (बोरकर परिवार) यांच्या वतीने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. दिवसभर खिचडीचे अन्नदान करण्यात आले. हर हर महादेवच्या जयघोषाने भुलेश्वर मंदिर परिसर दणाणुन गेला होता.