लोणी काळभोर : मैत्रिणीला मुळगावी सोडविण्यासाठी चाललेल्या दुचाकीला पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी येथे भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना काल शुक्रवारी (ता.१७) मध्यरात्री घडली आहे. या अपघातात लोणी काळभोर येथील महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.
पलक शिवहारे (वय २०, सध्या रा. लोणी काळभोर) असे मृत्यु झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर या अपघातात चिन्मय नागेंद्रमणी पांडे (वय २१) व भावेश पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकारणी पांडे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलक, चिन्मय, भावेश लोणी काळभोरमधील एका शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहेत. तिघेही एकमेकांचे मित्र असून लोणी काळभोर परिसरात राहतात. पलक हि शुक्रवारी मुळगावी रेल्वेने जाणार होती. तिला पुणे रेल्वे स्थानकात सोडविण्यासाठी चिन्मय, भावेश असे तिघेजण एकाच दुचाकीवरुन निघाले होते.
दरम्यान, पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी परिसरात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात पलकचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वाहनचालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.