पुणे : ‘मुंबई-सोलापूर वंदे भारत’मधून ६ दिवसांत तीन ३ हजार २७३ प्रवाशांनी पुण्यातून प्रवास केला आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ने जलद आणि आरामदायी प्रवास करता येत असल्यामुळे नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १० फेब्रुवारी रोजी मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन ‘वंदे भारत ट्रेन’चे उद्घाटन करण्यात आले होते. यातील मुंबई ते सोलापूर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ पुणेमार्गे सोलापूरला धावते. पुण्यातून धावणारी ही पहिलीच ‘वंदे भारत’ ट्रेन असल्यामुळे पुणेकरांमध्ये ‘वंदे भारत एक्स्प्रेस’विषयी कमालीची उत्सुकता होती. ती आता प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर पुणेकरांच्या पसंतीस उतरली आहे.
‘वंदे भारत एक्स्प्रेस’ने जलद आणि आरामदायी प्रवास करता येत असल्यामुळे नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पुणेकरांना सकाळी मुंबईला जाण्यासाठी ‘वंदे भारत’ सोयीची असल्यामुळे पुणे ते सोलापूरपेक्षा पुणे ते मुंबई प्रवासाला नागरिकांनी पसंती दिली आहे.
११ ते १७ फेब्रुवारी दरम्यान दोन हजार ५३९ प्रवाशांनी पुण्याहून मुंबईला प्रवास केला आहे. पुण्याहून सोलापूरला केवळ ७३४ प्रवाशांनी प्रवास केल्याचे दिसून आले. येत्या काही दिवसांच्या बुकिंगलादेखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मधून प्रवास करताना ‘पुणे ते सोलापूर’पेक्षा पुणे ते मुंबई प्रवासाला पसंती दर्शवली असल्याचे दिसून आले आहे.