पुणे : लग्नाचे आमिष दाखवून व मुलांचा सांभाळ करण्याचे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी भाजप-सेना युतीतील राज्याचे माजी सामाजिक न्याय तथा क्रीडामंत्री तसेच शिवसेनेचे नेते उत्तम प्रकाश खंदारे (वय – ६५) यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महादेव भोसले, बंडू दशरथ गवळी यांच्यासह एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका ३७ वर्षीय महिलेने बिबेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बिबेवाडीतील बी रेस्ट हाउस, पोकळे वस्ती येथील जाधव निवास या ठिकाणी २०१२ पासून वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम खंदारे यांनी फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आणि तिच्या मुलांचा सांभाळ करतो असे भासवून चाकूच्या धाकाने तिच्यासोबत नैसर्गिक आणि अनैसर्गिक कृत्य केले. फिर्यादीने महिलेने नकार दिला असता तिला विवस्त्र करून पट्ट्याने मारहाण करत तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
या दरम्यान संबंधातून जन्माला आलेल्या मुलाच्या संगोपनासाठी आर्थिक तरतूद म्हणून उत्तम खंदारे यांनी काही धनादेश फिर्यादी महिलेला दिले होते. परंतु ते धनादेश बँकेत वटले नाही. त्यानंतर आरोपी यांनी फिर्यादी महिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बिबेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.