पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची ओळख जागतिक स्तरावर व्हावी. ‘स्मार्ट सिटी’ म्हणून शहराचा लौकीक व्हावा. या करिता कायम सकारात्मक पुढाकार घेणारे लोकनेते दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे कार्य उद्योगनगरीच्या इतिहासातील ‘सुवर्ण लक्ष्मण पर्ण’ म्हणून सदैव स्मरणात राहील, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.
चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दि. ३ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. दि. १५ फेब्रुवारी रोजी प्रतिवर्षी स्वर्गीय आमदार जगताप यांचा वाढदिवस विविध सामाजिक, अध्यात्मिक उपक्रमांनी दिमाखात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी प्रथम जयंती साजरी होत आहे.
जगताप कुटुंबीय, भारतीय जनता पार्टीसह शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी, जगताप मित्र परिवार, समर्थकांनी सांगवी येथील दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप स्मृती स्थळी भेट दिली.
आमदार महेश लांडगे यांनी नतमस्तक होवून दिवंगत आमदार जगताप यांना अभिवादन केले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच, भाजपाच्या वतीने पक्षाच्या मोरवाडी येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयातही दिवंगत आमदार जगताप यांचे प्रतिमापूजन करण्यात आले.
पप्पा, आज असायला हवे होते…
लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवडकरांवर तळहातावरील फोडाप्रमाणे प्रेम केले. शहराला जपले. त्यांचे पिंपरी-चिंवचडला ‘मेट्रो सिटी’ करण्याचे स्वप्न होते. मात्र, पप्पा आपल्यातून निघून गेले.
या शहराला त्यांची उणीव कायम भासत राहील. प्रत्येकवर्षी उत्साहात वाढदिवस साजरा होत होता. यावर्षी जयंती साजरी करावी लागते आहे. पप्पा सदैव आमच्या कुटुंबासोबत आणि शहरातील प्रत्येक नागरिकासोबत आहेत.
‘‘तुमच्या संस्कारांचा आणि विचारांचा वारसा नेटाने आम्ही पुढे चालवू, असे वचन मी पप्पांना देते’’पप्पांची खूप आठवण येतेय. आज पप्पा असायला हवे होते…अशा भावना दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची कन्या ऐश्वर्या रेणुसे- जगताप यांनी व्यक्त केल्या आहेत.