पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामतीत रिक्षाच्या भाड्यामध्ये १ ऑगस्टपासून वाढ होणार आहे. पहिल्या एक किलोमीटरच्या टप्प्यासाठी २१ रुपये होते. त्यामध्ये २ रुपयांची वाढ होऊन प्रवाशांना २३ रुपये द्यावे लागणार आहे. तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १५ रुपये अकारणे बंधनकारक राहणार आहे. हे सर्व नवे दर १ ऑगस्टपासून लागू होणार आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये सीएनजी गॅस, पेट्रोल, डिझेल, आणि इंधनांचे दर आकाशाला भिडले आहेत. आर्थिक महागाईमुळे रिक्षा चालकाच्या हातात नफा उरत नव्हता. त्यामुळे भाड्यामध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी वारंवार रिक्षा चालक संघटनांकडून करण्यात येत होती. रिक्षाचालकांची होणारी आर्थिक परवड पाहता परिवहन प्राधिकरणाने हा मोठा निर्णय जाहीर केला आहे.
पुण्यात आता रिक्षाची फेरी मारण्यासाठी २१ रुपये मोजावे लागत आहे. या दरात २ रुपयांची वाढ होऊन आता ते दर हे २३ रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच एक किलोमीटरपेक्षा आणखी काही किलोमीटर पुढे गेल्यास हा दर आणखी वाढणार आहे. त्यामुळे येत्या १ ऑगस्टपासून पुणेकरांचा रिक्षा प्रवास माहागला आहे.
दरम्यान, वाढत्या महागाईमुळे रिक्षा चालकांचे नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. मात्र आता सरकार बदलल्यानंतर तरी इंधनाच्या दरांमध्ये आणखी काही दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.