पुणे : एका लोन कॉन्सिलरने बनावट ऑटोलोन प्रकरणे करुन स्टेट बँक ऑफ इंडियाला तब्बल ४६ कोटी ६५ लाख २६ हजार रुपयांना गंडा घातल्या प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विभागीय अधिकारी ममता कुमारी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, अदित्य नंदकुमार सेठीया (रा. प्रेमनगर सोसायटी, बिबवेवाडी) व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार स्टेट बँक ऑफ इंडिया युनिर्व्हसिटी रोड शाखा व टिळक रोड शाखेत (२०१७ ते २०१९) दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, स्टेट बँकेच्या युनिर्व्हसिटी व टिळक रोड शाखेमधून २०१७ ते २०१९ दरम्यान ४६ वाहन कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली होती. बँकेच्या अंतर्गत ऑडीटमध्ये ही प्रकरणे संशयित असल्याचे निष्पन्न झाले. बँकेने ऑटो लोन कॉन्सिलर म्हणून अदित्य सेठीया याची नेमणूक केली होती. त्याने कर्जदार व इतरांशी संगनमत करुन वाहन कर्ज घेण्यासाठी कट रचला.
त्यानंतर खोटे व बनावट कोटेशन, टॅक्स इन्व्हाईस, मार्जिन व काही फुल पेमेंटच्या रिसीट तयार केल्या. त्या खरे असल्याचे भासवून बँकेतून मोठ्या प्रमाणावर वाहन कर्ज मंजूर करुन घेतले. त्यातील काही प्रकरणांमध्ये ते सुरुवातीला काही इतर खात्यावर वर्ग करुन नंतर संबंधित वाहन कर्जदार याचे नावावर वर्ग केले. त्यामुळे बँकेची मूळ वाहन कर्ज मंजूर केलेल्या ४७ कोटी ६५ लाख २६ हजार रुपयांची फसवणुक केल्याचे समोर आले.
याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विभागीय अधिकारी ममता कुमारी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबतच्या तक्रार अर्जाची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.