अजित जगताप
सातारा : खटाव तालुक्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज नगरीमध्ये श्री महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे शिवलिलामृत ग्रंथाचे पारायण सोहळा सुरू झाला आहे. अनेक शिवभक्त सध्या रोज सकाळी सहा वाजता रुद्र अभिषेक व सकाळी ११ ते दुपारी १ वाजता शिव भक्त, माता-भगिनी शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन करत आहेत.
बुधवार दि. १५ ते दि. शुक्रवार १७ फेब्रुवारीपर्यंत संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ, दत्त भजनी मंडळ, ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ, वडूज ता. खटाव यांचे भजन व रात्री नऊ वाजता संत तुकाराम भजनी मंडळ, माऊली भजनी मंडळ, संत ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ, वडूज (ता. खटाव) यांच्या वतीने भजन व जागर कार्यक्रम होणार आहे.
त्याचबरोबर शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता श्री विश्वराध्याय रुद्र मंडल यांचे रुद्र पठण होईल. सायंकाळी सात वाजता महाआरती व रात्री ९ ते १२.२७ वाजता श्री ह. भ. प. बाल कीर्तनकार माऊली महाराज जाहूरकर यांचे महाशिवरात्री कीर्तन होणार आहे.
रात्री १२.२७ मिनिटे ते १.१७ मिनिटे बेल अर्पण सोहळा असा कार्यक्रम असून रविवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा ते रात्री नऊ वाजेपर्यंत कैलासवासी सदाशिव शिवाजीराव राऊत यांच्या स्मरणार्थ मंगेश राऊत व योगेश सतीश राऊत, योगिता अंकुश कुदळे (बोरगाव) यांच्यातर्फे महाप्रसाद होणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी शिवभक्त, ग्रामस्थ, दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे. या शिवलीलामृत ग्रंथाच्या वाचनासाठी श्री महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने ग्रंथ व्यवस्था करण्यात आलेले आहे. या तीन दिवस चालणाऱ्या धार्मिक सोहळ्यानिमित्त तयारी केली होती. वडूज नगरीमध्ये दरवर्षी धार्मिक उत्सव होत आहे. अशी माहिती महादेव मंदिर ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ, सार्वजनिक मंडळ, वडूज यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.