शिक्रापूर : पुणे नगर महामार्गावर कार व ट्रकचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना शिक्रापूर (ता. शिरूर) येथे आज बुधवारी (ता.१५) पहाटेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात डॉक्टर दांपत्यापैकी पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पती गंभीर जखमी झाले आहेत.
डॉ. सोनाली मच्छिंद्र खैरे (वय-३७, रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर डॉ. मच्छिंद्र नारायण खैरे असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी डॉ. कैलास बाळासाहेब बांदल (वय ४५ रा. भैरवनाथ शाळेजवळ पाबळ ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ट्रकचालक पवन भगवान साठे (वय २५ रा. किनी ता. जळगाव जि. बुलढाणा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर (ता. शिरुर) येथे डॉ. मच्छिंद्र खैरे व डॉ. सोनाली खैरे यांचे खैरे हॉस्पिटल आहे. खैरे डॉक्टर दांपत्य हे आज (बुधवारी) पहाटेच्या सुमारास कार (क्र एम एच १२ एच एन ३६५३) मधून पुणे नगर महामार्गावरील साई सहारा पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी गेले होते.
पेट्रोल भरुन परत येत असताना, खैरे डॉक्टर दांपत्य रस्ता ओलांडण्यासाठी पुणे बाजूकडे येत असताना, अहमदनगरच्या दिशेकडून पुण्याच्या दिशेकडे चाललेल्या भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने (क्र एम एच १२ क्यू जि ७४४७) खैरे यांच्या कारला जोरदार धडक दिली.
या अपघातात कारच्या डाव्या बाजूला बसलेल्या डॉ. सोनाली खैरे यांचा जागीच मृत्यू झाला तर डॉ. मच्छिंद्र खैरे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने शिक्रापूर येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दरम्यान, याप्रकरणी ट्रकचालक पवन साठे याच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राकेश मळेकर करीत आहे.