पुणे : पुणे शहराकडून उत्तर अमेरिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा कॅलिफोर्नियातील सॅन जोस शहरातील एका उद्यानातून चोरीला गेल्याचे समोर आले होते. दरम्यान, हा पुतळा अमेरिकेतील एका जुन्या वस्तू विक्री दुकानात हा पुतळा सापडला आहे.
संतापजनक बाब म्हणजे, या पुतळ्याला फोडण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याची माहिती आहे. हे दुकान बेकायदेशीर व्यवहारांसाठी कुप्रसिद्ध आहे. या दुकानातील कर्मचाऱ्यांनी तीन जण हा पुतळा घेऊन आल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यापैकी दोन पुरुष तर एक महिला होती. हे तिघे जण २९ जानेवारी रोजी हा पुतळा घेऊन या दुकानात आले होते.
दरम्यान, ९ फेब्रुवारी रोजी हा पुतळा या दुकानात दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी या दुकानावर धाड टाकली आणि पुतळा हस्तगत केला. याप्रकरणी अद्याप या कुणालाही अटक करण्यात आलेली नसून आरोपींचा शोध सुरू आहे.
या पुतळ्याची चोरी झाल्याची तक्रार ३१ जानेवारीला दाखल झाली होती. शिवरायांच्या या पुतळ्याचे वजन सुमारे २०० किलो इतके आहे. हा पुतळा उत्तर अमेरिकेतील सॅन जोस शहराला १९९९ सालात पुणे शहराकडून भेट स्वरुपात मिळाला होता.