लहू चव्हाण
पाचगणी : महाबळेश्वर ही माझी जन्मभूमी आहे. दुर्गम भागातील जनतेच्या आणि तांबडया मातीच्या आशीर्वादानेच मी मुख्यमंत्री पदापर्यंत पोचलो आहे. स्व.बाळासाहेब भिलारे दादा यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यामुळे या मातीचे ऋण फेडण्यासाठी मी आतापर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. तसेच यापुढेही मी महाबळेश्वर तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे अभिवचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर तालुक्यातील जनतेला दिले आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावचे सुपुत्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत. आपला माणूस मुख्यमंत्री झाल्यानतंर महाबळेश्वर तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील अभिवचन दिले आहे. या वेळी महाबळेश्वरचे माजी सभापती संजूबाबा गायकवाड, समन्वय समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण शेठ भिलारे, युवा नेते व स्ट्रॉबेरी असोसिएशनचे अध्यक्ष नितीनदादा भिलारे, पुस्तकांच्या गावचे सरपंच शिवाजी भिलारे, गणपत पार्ट, किसन भिलारे, शशिकांत भिलारे, राजेंद्र भिलारे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे आदी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांची आपुलकीने चौकशी करून विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी बोलताना बाळासाहेब भिलारे यांची उणीव भासल्याचे मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवले, तर तुम्ही कसलीही काळजी करू नका मुख्यमंत्री पदाच्या पदाच्या माध्यमातून महाबळेश्वर तालुक्याला आपण विकासात झुकते माप देणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी निश्चिंत राहा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.