अजित जगताप
वडूज : सरकारी कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी वर्षातून एकदा तपासणी करण्यात येत असते. त्यातून कामकाजात सुरळीत पणा येत असतो. वडूज (ता. खटाव ) येथील पंचायत समितीच्या इमारतीत वार्षिक तपासणीच्या वेळी एका उपायुक्त दर्जाचे चक्क काही अभियंता वर्गाला अपमानास्पद वागणूक दिली. भर बैठकीत मार्मिक बोल सुनावल्याने वातावरण चांगलेच गंभीर बनले होते. त्याबाबत राज्य पातळीवरील जिल्हा परिषद संघटनांनी नाराजी व्यक्त करून या प्रकरणी पडदा टाकला आहे.
याबाबत माहितीगारांनी सांगितले की, वडूज येथील पंचायत समितीच्या कार्यालयात गुरुवार दि २१ जुलै रोजी दुपारी दोन वाजता सर्व विभागाचे कार्यालया प्रमुख व कर्मचारी वर्ग सभागृहात जमले होते. एकाच वेळी सर्वजण आल्याने आसन व्यवस्था अपुरी पडली. त्यामुळे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता व स्थापत्य अभियंता सहाय्यक व काही कर्मचारी आपल्या वरिष्ठांची परवानगी घेऊन सभागृहाच्या बाहेर येऊन पंचायत समितीच्या आवारातच थांबले होते. यावेळी दोन उपायुक्त पैकी एका उपायुक्त यांनी बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता व विस्तार अधिकारी यांना पुन्हा सभागृहात बोलावून आरोपींना जशी वागणूक देतात. तशा प्रकारे वागणूक दिली. सुमारे दीड तास त्यांना बैठक संपे पर्यंत उभे करून ठेवले. यामध्ये काही अपंग सुध्दा होते.
या वागणुकीने सर्वांनाच मानसिक धक्का बसला असला तरी कोणीही आपल्या न्याय हक्कासाठी लेखी अथवा तोंडी तक्रार नोंदवली नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा ठरला आहे. एक उपायुक्त शांत व संयमी होते. सुशिक्षित असलेल्या या अधिकाऱ्यांची भावजय आमदार असूनही त्यांनी शांतपणे तपासणी केली. पण, पुणे येथील उपायुक्त यांनी पदाचा भान ठेवून वागणूक दिली पाहिजे होती.तपासणीत काही त्रुटी असतील तर सूचना केल्या पाहिजे होत्या. असे न घडता सर्वांच्या समोर असंसदीय भाषा वापरणे योग्य नाही. असा सूर उमटला आहे.
दरम्यान , अनावधानाने असा प्रकार घडला होता. सभागृहात जागा कमी असल्याने काही कर्मचारी सभागृहाच्या बाहेर थांबले होते. असे पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, खटाव तालुक्यातील सर्वच शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग चांगले काम करीत असताना अशा पद्धतीने कोणाला अपमानास्पद वागणूक मिळणे अपेक्षित नाही. याबाबत दिलगिरी व्यक्त केली असली तरी भविष्यात असा प्रकार घडू नये याची उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा मनसे रोजगार व स्वयं रोजगार विभाग जिल्हाध्यक्ष सुरज लोहार, सामाजिक कार्यकर्ते दत्ता केंगारे, आर पी आयचे प्रतिक गायकवाड यांनी दिला आहे.