हडपसर : बंगला विक्रीसाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून दलालांनी अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ११ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना कोंढवा (पुणे) परिसरात घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी २ जणांना ताब्यात घेतले असून ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अब्बास इब्राहिम कपाडिया (वय ७०) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने मुद्रीक मर्चंट (रा. हडपसर) आणि परवेझ मुर्ताजा (रा. कोंढवा) याला ताब्यात घेतले आहे. तर फरिदा मर्चंट, अबिद शेख, आयेशा, धनंजय राठोड, अस्लम मुजावर यांच्यासह साथीदारांच्या विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपाडिया हे अमेरिकेत वास्तव्यास असून त्यांचा कोंढवा भागात बंगला आहे. त्यांना तो बंगला विकायचा होता. त्यासाठी त्यांनी नातेवाईक आणि अबिद शेख यांच्यावर विश्वास ठेवून सदनिका, बंगले खरेदी विक्री करणाऱ्या दलालांना कागदपत्रे दिली.
त्यानंतर आरोपींनी कागदपत्रांचा गैरवापर करून कपाडिया आणि त्यांच्या पत्नीच्या नावे बनावट पॅनकार्ड, आधारकार्ड तयार केले. कागदपत्रांच्या आधारे दलालांनी गहाण खत तयार केले. बनावट कागदपत्रांचा वापर करुन बँकेकडून तब्बल ११ कोटी ८० लाखांचे कर्ज घेतले. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दरम्यान, कपाडिया यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने कोंढवा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रुईकर करीत आहेत.