दीपक खिलारे
इंदापूर : शासनाच्या कुसुम योजनेतून सोलर कृषी पंपाचे अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोन सख्ख्या भावांनी तीन जणांना २ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक प्रकार तरंगवाडी (ता. इंदापूर)येथे नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन भावांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्नील विठ्ठल बंडगर व विजय विठ्ठल बंडगर (दोघे रा. वडापूरी, ता. इंदापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी तरंगवाडी येथील एका ३७ वर्षाच्या शेतकर्याने इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची तरंगवाडी येथे शेती आहे. त्यांनी शेतीमध्ये लाईट व्यवस्थित चालत नसल्याने सोलर कृषी पंपासंदर्भात माहिती घेत होते. तेव्हा फिर्यादी यांना आरोपी स्वप्नील बंडगर हे सोलरचे कनेक्शन देत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपी स्वप्नील यांच्या इंदापूर येथील कार्यालयात भेट घेतली.
यावेळी आरोपी स्वप्नील याने फिर्यादी यांना सांगितले कि, मी पुण्यातील कंपनीमार्फत तुमच्या शेतीमध्ये शासकीय कुसुम योजनेअंतर्गत ८० टक्के अनुदानावर सोलर कृषी पंप बसवून देतो. त्यानंतर फिर्यादी, त्यांचा चुलत भाऊ, चुलते यांची आधार कार्ड व इतर कागदपत्रे तसेच प्रत्येकी २ हजार रुपये प्रमाणे ८ हजार रुपये आरोपी स्वप्नील याने घेतले. व त्यांच्याकडून फॉर्म भरुन घेतले.
त्यानंतर आरोपी स्वप्नील याने काही दिवसांनी फिर्यादी यांनी सांगितले कि, तुमचे अनुदान मंजूर झाले आहे. तुम्हाला शासनाचे ८० टक्के अनुदान मिळेल. उर्वरीत २० टक्के रक्कम दोन दिवसात भरावी लागेल़, नाही तर ४० टक्के रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार ५ एच पी सोलर कृषी पंपासाठी प्रत्येकी ६४ हजार १९२ रुपये प्रमाणे एकूण २ लाख ५६ हजार ७६८ रुपये भरावे लागतील, असे सांगितले.
दरम्यान, फिर्यादी यांच्याकडून आरोपीने रोख व भावाच्या पे फोनवर पैसे घेतले. त्यानंतर त्यांनी सोलर पंप कधी बसविणार याची चौकशी केल्यावर आरोपीने टाळाटाळ केली. तसेच फिर्यादी हे पुण्यात येऊन पौड रोडवरील कंपनीच्या कार्यालयाच्या पत्तावर शोध घेतला असता तेथे कंपनीचे कार्यालय नसल्याचे आढळून आले.
फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने इंदापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि स्वप्नील बंडगर व विजय बंडगर यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार दोन्ही भावांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.